Wednesday, August 22, 2018

माणूस.........

माणूस.........

कुढतो जास्त ,
अन रडतो कमी !
म्हणून त्याचं हृदय ,
धडधडत असतं नेहमी !

                बोलणं कमी झाल्यामुळे ,
                   प्रश्न निर्माण झालेत !
                     सारं काही असूनही ,
                    एकलकोंडे  झालेत !

भावनांचा कोंडमारा ,
होऊ देऊ नका !
हसणं आणि रडणं ,
दाबून ठेऊ नका !

                आपल्या माणसांजवळ ,
                    व्यक्त झालं पाहिजे !
                   खरं खरं दुःख सांगून ,
                   मोकळं रडलं पाहिजे !

हसण्याने , रडण्याने ,
दबाव होतो कमी !
भावनांचा निचरा ,
ही बरं होण्याची हमी !

             कुणाशी तरी बोला म्हणजे ,
                  हलकं हलकं वाटेल !
                 दुःख जरी असलं तरी ,
                   मस्त जगावंस वाटेल !

येऊद्यानं कंठ दाटून ,
काय फरक पडतो  ?
आपल्या माणसाजवळच,
गळ्यात पडून रडतो !

            आपली माणसं, आपली माणसं,
              बाजारात मिळत नसतात !
                 नाती-गोती जपून ती ,
               निर्माण करावी लागतात !

भौतिक साधनं जमवू नका ,
आपली माणसं जमवा !
नाहीतर तुम्ही गरीब आहात ,
कितीही संपत्ती कमवा !

                 हाय , हॅलो चे मित्र बाबा ,
                  काही कामाचे नसतात !
                   तुझी पाठ वळली की ,
                     कुत्सितपणे हसतात !

हसण्यासाठी, रडण्यासाठी,
माणसं जपून ठेव !
नाहीतर मग घरात एखादा,
"रोबोट" तरी आणून ठेव !

              रोबोटच्याच गळ्यात पडून ,
                   हसत जा , रडत जा !
                  शांत झोप येण्यासाठी ,
                  दररोज गोळ्या घेत जा !

दुःख उरात दाबून वेड्या ,
झोप येत नसते !
हसत खेळत जगण्यासाठी 
माणसांचीच गरज असते ,

                   इथून पुढे भिशी कर ,
              हसण्याची अन रडण्याची !
               हीच खरी औषधं आहेत ,
            उदासिनतेच्या* बाहेर पडण्याची !!

जगणे म्हटले तर खूप अवघड
म्हटले तर सोपे आणि सहज

छोटे छोटे प्रसंग सांगतात

सत्य - असत्य
म्हटले तर शिकवण 
नाहीतर नुसतीच वण वण....

आधारित....

Sunday, June 17, 2018

आई-वडील...!!?

आई-वडील...!!?

आम्ही कांय तुम्हांला 
जन्मभर पूरणार 
आहोत कां..?
  
असं आई सहज  
म्हणून गेली...

ऐकून हे माझ्या काळजांत
आरपार एक कळ निघून 
गेली...

त्रिवार सत्य होतं. पण, 
पटतच नव्हतं मनांला...

कधीच विसरणार नाहीत 
आपण त्यांच्या सोबतच्या 
क्षणांला...

आई बोलून गेली. पण,
वडील पाहून हसत होते...

खरं सांगू कां, 
तेव्हा ते दोघंही मला
विठ्ठल रुक्मिणीच 
वाटत होते...

लेकरांच्या सुखांतच 
त्यांचं सुख असतं 
दडलेलं.....

आपण सुंदर 
शिल्प असतो, 
त्यांच्याच हातून 
घडलेलं...

मी म्हणालो, आईला 
तू कीती सहज बोलून 
गेलीस...

तुमच्या शिवाय 
जगण्याची 
तू कल्पनाच 
कशी केलीस... 

जग दाखवलं 
तुम्ही आम्हांला 
किती छान 
बनवलंत...

अनेकदा ठेच 
लागण्यांपासून 
तुम्हीच तर 
सावरलंत...

तुमच्या चेहऱ्यावर 
हसू पाहण्यासाठी 
आम्ही कांहीही करू...

तुमच्या स्वप्नांतील 
चित्रांत आम्ही 
यशाचेच रंग भरु...

आई वडील म्हणजेच 
घरांतील चालते बोलते 
देव आहेत...

हे देव नैवेद्यापेक्षा फक्त 
प्रेम व आधाराचेच 
भुकेले आहेत...

कल्पवृक्षाखाली 
बसलो होतो, फळं फुलं 
माझ्यावरच पडत होती...

आई वडील 
अनमोल आहेत, 
असं प्रत्येक पाकळी 
सांगत होती...

थकलीय आज 
आई प्रत्येकाची, 
वडीलही थकले 
आहेत...

घरट्यातल्या पिल्लानं 
उडू नये, फक्त एवढ्यांच 
त्यांच्या अपेक्षा आहेत...

माझ्या या विचारानं 
आई खूप खूप 
सुखावली होती...

वडीलांची नजर 
न बोलताही 
सारं कांही सांगून 
जात होती...

कालाय तस्मै नम: 
वर्षे अशीच सरतात, 
आमचे संसार 
फुलू लागतात...

आणि बघता बघता, 
आमचे आई बाप 
म्हातारे होतात...

हौसमजा, जेवण खाण, 
त्याचं आतां कमी होत 
चाललंय... 

पण, फोनवर सांगतात, 
आमचं अगदी उत्तम 
चाललंय...

अंगाला सैल होणारे कपडे,
गुपचूप घट्ट करून घेतात...

वर्षे अशीच सरतात, 
बघतां बघतां, 
आमचे आई बाप 
म्हातारे होतात...

कोणी समवयस्क 
"गेल्या"च्या बातमीनं 
हताश होतात...

स्वत:च्या पथ्य पाण्यांत,
आणखीन थोडी 
वाढ करतात...

आमच्या 'खाण्यापिण्याच्या'
सवयींवर नाराज होतात...

वर्षे अशीच सरतात, 
बघतां बघतां, 
आमचे आई बाप 
म्हातारे होतात...

आधार कार्ड, पॅन कार्ड 
जीवापाड सांभाळतात...

इन्कम टॅक्सच्या भीतीनं
कावरे बावरे होतात...

मॅच्युर झालेली एफ.डी.
नातवासाठी रिन्यू करतात...

वर्षे अशीच सरतात, 
बघतां बघतां, 
आमचे आई बाप 
म्हातारे होतात...

पाठदुखी, कंबर दुखी 
इत्यादीच्या तक्रारी 
एकमेकांकडे करतात...
 
अॅलोपाथीच्या 
साइड इफेक्टची 
वर्णनं करतात...

आयुर्वेदावरचे 
लेख वाचतात...

होमिओपॅथीच्या 
गोळ्या खातात...
 
वर्षे अशीच सरतात, 
बघतां बघतां, 
आमचे आई बाप 
म्हातारे होतात...

कालनिर्णयची 
पानं उलटत, 
येणाऱ्या सणांची 
वाट बघतात...

एरवी न होणाऱ्या 
पारंपारीक पदार्थांची 
जय्यत तयारी करतात...
 
आवडीनं जेवणाऱ्या 
नातवाकडं भरल्या 
डोळ्यानं पाहतात...

वर्षे अशीच सरतात, 
बघतां बघतां, 
आमचे आई बाप 
म्हातारे होतात...

माहित आहे, 
हे सगळं, आता 
लवकरच संपणार...

जाणून आहोत, 
हे दोघंही आता 
एका पाठोपाठ 
जाणार... 

कधीतरी तो 
अटळ प्रसंग
 येणार...

कांळ असाच 
पळत राहणार...

वर्षे अशीच 
सरत राहणार... 

बघता बघतां
आम्ही देखील
असंच...
 
आमच्या मुलांचे
म्हातारे आई बाप
होणार....!!!

बघतां बघतां
आम्ही देखील
असंच...
 
आमच्या मुलांचे
म्हातारे आई बाप
होणार....!!!


From: WhatsApp Post

Tuesday, May 22, 2018

संयम शिकविणारी फार सुंदर कविता...

प्रमोद जोशी यांच्यी  सुरेख कविता... 

"मी सुद्धा चुकलो असेन",
एवढं मनात आणा!
धनुष्य मग हातातलं,
जरा संयमानंच ताणा!

बाणच हळू कानात सांगेल,
'ठेव मला भात्यात!
एवढं ऊन, एवढा पाऊस,
असणारच की नात्यात!'

वादा जवळ गप्प बसून,
संवाद करू, मारू गप्पा!
तुटण्या किंवा उसवण्याचा,
येणारच नाही टप्पा!

तेवढाच क्षण टळल्यावर
आकाश होतं साफ!
दंव होऊन गारवा देते,
तीच गरम गरम वाफ!

एक क्षण आवेगाचा,  
फुटण्यापुर्वी अडवा!
डोळे सुद्धा राग बोलतात,
पापण्यांमागे दडवा!

थोडी गुदमर, थोडी घुसमट,
उंबरठ्यावर दाटेल!
राख झाली तरी चालेल,
असं वाटेल, ...पटेल!

दिवस रात्र असणारच,
तेव्हा आपण पूर्व बघू!
प्रकाशाचे वारकरीच की!
आपण उगवतीला निघू!

पहिली ठिणगी पडते तेव्हा,
विचार व्हावा पाणी!
मनात सूर जपतो तेव्हाच,
शब्द होतात गाणी!

कधीकधी आठवण्याहून,
विसरण्यातच मजा!
बेरजेपेक्षा कधीकधी ,
जोडून देते वजा!

बाकी उरणं महत्वाचं,
तेवढीच श्री शिल्लक!
कविता असेल साधी,
पण् विचार मात्र तल्लख!