प्रमोद जोशी यांच्यी सुरेख कविता...
"मी सुद्धा चुकलो असेन",
एवढं मनात आणा!
धनुष्य मग हातातलं,
जरा संयमानंच ताणा!
बाणच हळू कानात सांगेल,
'ठेव मला भात्यात!
एवढं ऊन, एवढा पाऊस,
असणारच की नात्यात!'
वादा जवळ गप्प बसून,
संवाद करू, मारू गप्पा!
तुटण्या किंवा उसवण्याचा,
येणारच नाही टप्पा!
तेवढाच क्षण टळल्यावर
आकाश होतं साफ!
दंव होऊन गारवा देते,
तीच गरम गरम वाफ!
एक क्षण आवेगाचा,
फुटण्यापुर्वी अडवा!
डोळे सुद्धा राग बोलतात,
पापण्यांमागे दडवा!
थोडी गुदमर, थोडी घुसमट,
उंबरठ्यावर दाटेल!
राख झाली तरी चालेल,
असं वाटेल, ...पटेल!
दिवस रात्र असणारच,
तेव्हा आपण पूर्व बघू!
प्रकाशाचे वारकरीच की!
आपण उगवतीला निघू!
पहिली ठिणगी पडते तेव्हा,
विचार व्हावा पाणी!
मनात सूर जपतो तेव्हाच,
शब्द होतात गाणी!
कधीकधी आठवण्याहून,
विसरण्यातच मजा!
बेरजेपेक्षा कधीकधी ,
जोडून देते वजा!
बाकी उरणं महत्वाचं,
तेवढीच श्री शिल्लक!
कविता असेल साधी,
पण् विचार मात्र तल्लख!